Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद अद्यापही शमला नाही. तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात यांनी सांगितले. यातच महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट या पक्षातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. अशातच उद्धव सेनेने परस्पर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसने योग्य पद्धतीने वाटाघाटी केल्या नाही म्हणून जागावाटपाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी नाराज झाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
राहुल गांधींनी प्रत्येक उमेदवाराबाबत आम्हाला काही सूचना केल्या
आमची बैठक बराच वेळ चालली. लवकरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. या यादीवर केंद्रीय निवडणूक समितीबरोबर चर्चा झाली. आम्ही परत निवडणूक समितीशी चर्चा करू. राहुल गांधी यांनी बऱ्याच उमेदवारांबाबत चर्चा केली. एकेका उमेदवाराची माहिती घेतली. योग्य उमेदवार निवडले जावे आणि पुढेही उमेदवार निवडीत गफलत होऊ नये, त्यामध्ये चुका होऊ नये, मेरिटवर उमेदवार निवडले जावे, प्रत्येक मतदारसंघातील जातीय समीकरणे उत्तम राखली जावी यावर प्रदीर्घ चर्चा झाली. राहुल गांधी यांनी प्रत्येक उमेदवाराबाबत, प्रत्येक मतदारसंघाबाबत माहिती घेऊन आम्हाला काही सूचना केल्या, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्ष माध्यमांच्या माध्यमातून टार्गेट केला जातो, असंच आम्हाला दिसत आहे. सोशल इंजिनिअरिंग हा राहुल गांधींचा विशेष भाग आहे. देशातील, राज्यातील सगळ्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे, ही अपेक्षा राहुल गांधींची आहे. सगळ्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधींची आहे. महाविकास आघाडीमध्ये मेरिटनुसार त्या त्या जागा त्या त्या पक्षाला मिळाव्या अशी आमची भूमिका आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.