Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत महायुती सत्तेतून हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन, असे मोठे विधान काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला. सत्तेतील आमदार मी असेन, असा मला विश्वास वाटतो. विश्वास नाही, मला खात्री आहे. उद्या रात्रीच आम्ही महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत. १६० ते १६५ जागांवर महाविकास आघाडी जिंकेल, हे खात्रीशीर सांगतो. एक्झिट पोलचे आकडे वगैरे ते सगळे नंतर बघू. त्यामुळे आम्ही चिंता करत नाही. आम्ही बिंधास्त आहोत, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
उद्या सत्ता येणार आणि सत्तेमध्ये मी असणार
आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतमोजणीवेळी सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. काय काळजी घ्यावी, हेही सांगितले आहे. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचे नाही, अशाही सूचना केल्या आहेत. उद्या दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल. हायकमांड जो निर्णय घेईल, तो माझ्यासाठी अंतिम आहे. महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता हे पद दोनवेळा सांभाळले आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे ती मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. उद्या सत्ता येणार आणि सत्तेमध्ये मी असणार, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, बारा तासाच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही घोषित करू. उद्या सगळ्यांना आम्ही उद्या रात्रीच मिळेल त्या व्यवस्थेत बोलावले आहे, आणि विदर्भातील सर्वांना घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर हायकमांडने सोपवलेली आहे. शरद पवारांचे मार्गदर्शन आहे, मल्लिकार्जुन खर्गे आम्हाला वारंवार सूचना करत आहेत, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.