Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. केंद्रातील नेते, पदाधिकारी राज्यात येऊन प्रचार करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असून, कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सांगलीत आता जयश्री पाटील यांच्या उमेदवारीवरून खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम आता आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरून निवडणूक जिंकलेल्या विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी जयश्री पाटील यांच्या प्रचारसभेत सहभागी होत त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच यावर ठाम राहत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या विश्वजित कदम यांनी मात्र विधानसभेवेळी वेगळा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. बंडखोरास मत दिले तर ती भाजपाला मदत होणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगत एक प्रकारे जयश्री पाटील यांना आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नेमके काय म्हणाले विश्वजित कदम?
सांगलीमध्येकाँग्रेसअंतर्गत बंडखोरी करण्यासाठी जयश्री पाटील यांना कोणी फितवले हे ज्या दिवशी समजेल, त्या दिवशी त्यांची काही खैर नाही. जयश्री पाटील या भोळ्या व सरळमार्गी आहेत. लोकसभेवेळीच खासदारकीसाठी विशाल पाटील, विधानसभेसाठी पृथ्वीराज पाटील आणि विधान परिषदेवर जयश्री पाटील यांना पाठवण्याचे ठरले होते. मात्र, त्यांना कुणी तरी फितवले आणि बंडखोरी करण्यास भाग पाडले. जे घडायला नको होते ते सांगलीत घडले. बंडखोरी असली तरी काँग्रेस आता ताकदीने निवडणूक लढवेल आणि विजय संपादन करेल. सांगलीकरांनी एकदा आमदारपदाची संधी दिली तर विकास म्हणजे नेमका काय असतो हे दाखवून देईन. बंडखोरी भाजप पुरस्कृत असल्याने त्यांना मत दिले तर भाजपला मदत होणार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीलाच मतदान करावे, असे विश्वजित कदम यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
विशाल पाटील यापूर्वी काय म्हणाले होते?
२०१४ नंतर वसंतदादा कुटुंबाला एकदाही उमेदवारी मिळाली नाही. लोकसभेत आणि विधानसभेत फसवणूक झाली. वसंतदादा कुटुंबांने काँग्रेस पक्षाच्या विरोधात नेमकी काय चूक केली कळत नाही. वसंतदादा कुटुंबाची निष्ठा कुठे कमी पडली का? आदर्श कुठे कमी पडले का? एवढे होऊनी मी खासदार झाल्यावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. जयश्री पाटील यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीची उमेदवारी आहे, असे मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला? का न्याय मिळत नाही हे कळत नाही. जयश्री पाटील लोकसभेला सर्वात पुढे होत्या, असे विशाल पाटील यांनी सांगितले होते.
दरम्यान, विश्वजित कदम यांनी काँग्रेसला पाठिंबा कायम ठेवला असून, जयश्री पाटील यांना दिलेले समर्थन विशाल पाटील कायम ठेवतात का, जयश्री पाटील अपक्ष म्हणून निवडून येऊन सांगली पॅटर्नचा प्रत्यय पुन्हा राज्याला पाहायला मिळतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम राहिल्या आणि उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे सांगलीत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.