यदू जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभेच्या राज्यातील ३६ जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. २५२ जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत. या ३६ पैकी १३ जागा या विदर्भातील आहेत. त्यात आकोट, अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, मोर्शी, आर्वी, सावनेर, उमरेड, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, आर्णी आणि उमरखेडचा समावेश आहे. नांदेड दक्षिण, देगलूर, मालेगाव मध्य, डहाणू, वसई, भिवंडी पूर्व, कल्याण प., उल्हासनगर, बोरीवली, वर्सोवा, मानखुर्द शिवाजीनगर, शिवडी, पेण, खडकवासला, पुणे कँटोन्मेंट, श्रीरामपूर, बीड, माढा, सोलापूर मध्य, पंढरपूर, माळशिरस, फलटण, कोल्हापूर उत्तरमध्ये दोघांनीही उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
दोन्ही बाजूंनी उमेदवार जाहीर न होण्यामागे काही कारणे सांगितली जातात. आर्वीत आमदार दादाराव केचे की, सुमित वानखेडे हा निर्णय झालेला नाही. मविआकडून वर्धेचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा यांना उमेदवारी मिळू शकते. सावनेरमध्ये आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या काँग्रेसच्या उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. भाजपचा उमेदवार ठरायचा आहे.
३६ पैकी १५ मतदारसंघांत भाजपचे आमदार
महायुती वा महाविकास आघाडी या दोन्हींपैकी कोणीही उमेदवार जाहीर केलेले नाहीत, अशा ३६ जागांपैकी १५ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. ते असे - प्रकाश भारसाकळे - आकोट, दादाराव केचे - आर्वी, डॉ. देवराव होळी - गडचिरोली, डॉ. संदीप धुर्वे - आर्णी, नामदेव ससाणे -उमरखेड, कुमार आयलानी - उल्हासनगर, सुनील राणे - बोरीवली, भारती लव्हेकर - वर्सोवा, रविशेठ पाटील - पेण, राम सातपुते - माळशिरस, समाधान औताडे - पंढरपूर. (कारंजाची जागा भाजपचे राजेंद्र पाटणी यांनी, तर अकोला प. जागा गोवर्धन शर्मा यांनी जिंकली होती, त्यांचे निधन झाले.)
हे उमेदवार प्रतीक्षेत
- सोलापूरला लोकसभा हरलेले माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना माळशिरसमधून भाजपने अद्याप उमेदवारी दिलेली नाही.
- पुणे कँटोन्मेंटमध्ये भाजपचे सुनील कांबळे अद्यापी प्रतीक्षेत आहेत.
- खडकवासलामध्ये भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांची तीच स्थिती आहे.
समोरचा उमेदवार कोण याची प्रतीक्षा
- मेळघाटचे विद्यमान आमदार बच्चू कडूंचा प्रहार पक्ष सोडून शिंदेसेनेत गेले, पण त्यांना शिंदेसेनेची उमेदवारी मिळाली नाही. ही जागा भाजपकडे जाणार असे म्हटले जाते.
- या ३६ मध्ये काही मतदारसंघ असे आहेत की, महायुती वा मविआत कोणता मित्रपक्ष लढणार हे नक्की नाही किंवा जागावाटप झालेले असले, तरी समोरचा उमेदवार कोण याची प्रतीक्षा केली जात आहे.
किती जागा आहेत अजून बाकी?
- महायुतीचे अद्याप ९९ उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. महाविकास आघाडीच्या १३० जागा अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. उमेदवार जाहीर करण्याबाबत सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतली आहे.
- दोन्हींनी उमेदवार दिलेले नाहीत, अशा ३६ मतदारसंघांपैकी ७ मतदारसंघ असे आहेत की, जिथे २०१९ मध्ये दोन्हींना विजय मिळाला नव्हता. तेथे अपक्ष वा लहान पक्षांचे उमेदवार जिंकले होते. त्यात प्रहार, एमआयएम, बहुजन विकास आघाडी, अपक्ष आमदारांचा समावेश आहे.