VBA Prakash Ambedkar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारांचा नेमका कौल काय असणार, हे उद्या प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेस काही जागा कमी पडल्यास अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे.
"उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखे संख्याबळ मिळाल्यास आम्ही जो सरकार स्थापन करून शकेल, अशा आघाडीसोबत जाणं पसंत करू," असं प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, त्यावरच अवलंबून असणार आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपावर तोडगा निघू न शकल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीत स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अन्य उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला यश येते की त्यांच्या पदरी पुन्हा अपयश येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.