Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ तारखेला लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तत्पूर्वी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता एक्झिट पोल येत आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला किती जागा मिळू शकतील, याबाबत काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत राज्यभरात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. मनसे संपूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरली. राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून अनेक प्रचारसभा घेतल्या. तसेच आताच्या गढूळ झालेल्या राजकीय परिस्थितीवर टीकेची झोड उठवत एकदा राज्य हातात देऊन पाहा, असे आर्त आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले.
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार?
सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मनसेला फार मोठे यश मिळताना दिसत नाही. अपक्ष आणि इतर यांमध्ये मनसेला स्थान देण्यात आले आहे. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार, मनसेला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून २० जागा येऊ शकतात, असा अंदाज बांधण्यात आला आहे. चाणक्य एक्झिट पोलनुसार, अपक्ष, मनसे, वंचितच्या उमेदवारांचा ६ ते ८ जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मनसेची कामगिरी संपूर्ण राज्यात कशी राहते, यापेक्षा माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे बाजी मारणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांचे तगडे आव्हान होते. अमित ठाकरे यांनी जोरदार प्रचार करत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. आता मतदारांनी कुणाच्या पारड्यात कौल दिला, हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.