Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "युगेंद्र लहानाचा मोठा मुंबईत झाला, कुठलाही अनुभव ..." अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:44 PM2024-11-12T13:44:33+5:302024-11-12T13:45:15+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढत आहेत. ही लढत म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे. यामुळे राज्यातच नाहीतर देशात या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रचारसभा सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज 'बोल भिडू' या युट्यूब चॅनेलने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार म्हणाले,युगेंद्र पवार यांचे सगळे लहानपण मुंबईत गेले आहे. ते कधी दिवाळी नाहीतर सुट्टीला कधी आली तर येत होती. यांना बारामती किंवा हा परिसर आवडायचा नाही, कित्येकदा मीच माझ्या भावाला म्हणायचो की, यांना दिवाळी निमित्ताने तर येऊद्यात, सगळे एकत्र राहतील. तर ते म्हणायचे त्यांना इकडच वातावरण जास्त आवडत नाही त्यामुळे ते तिकडेच जास्त करुन राहत होते, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, एकदमच मध्ये लोकसभा निवडणूक आणि माझ्या भावाने शरयू फॅक्टरी सुरू केली आहे. ती त्याला त्यांनी बघायला दिली आहे, बारामतीमध्ये शरयू टोयोटा आहे तीही तोच बघतो. यामुळे त्याचं इकडे येणे वाढल आहे. पण मी बारामतीमध्ये अनेक वर्षे काम केले. २४ वर्षाचा असताना एका कारखान्याचा संचालक झालो. तिथ बरीच वर्ष काम केल्यानंतर मी तालुक्यात काम सुरु केले. १९९१ ला मी पीडीसीसी बँकेचा संचालक झालो, त्यानंतर मी चेअरमन झालो. त्यानंतर १९९१ ला मला खासदारकीच तिकीट मिळालं. १९८४ पासून शेती बघत ही काम केली, पण युगेंद्रला कोणत्याही प्रकारच्या कामाचा अनुभव नाही. शरद पवार सांगतात उच्चविद्याभूषित आहे, असा टोलाही अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना लगावला.
"माझं काम बारामतीकरांनी बघितलं आहे. अनेक लोकांनी बारामती कशी बदलत गेली हे बघितलं आहे, यामुळे माझा माझ्यावर विश्वास आहे, असंही अजित पवार म्हणाले. महायुतीचे सरकार कस सत्तेवर येईल या ध्येयाने आम्ही पुढे निघालो आहे, आम्ही आमच्या कामावर निवडणूक लढवत आहे, असंही पवार म्हणाले.