काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा खासदारकीची मुदत संपली की राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. यावर अजित पवार यांनी देखील आपली निवृत्ती जाहीर केली आहे. परंतू तोवर हाच पठ्ठ्या कामं करणार, दुसऱ्या कोणाचा घास नाही, असेही अजित पवारांनी सांगितले.
या आधी तुम्ही मला 14 वेळा निवडून दिले आहे. आता कुठेतरी थांबले पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे असे शरद पवार म्हणाले होते. अजित पवारांनी आज शेजारच्या फलटणमध्ये सभेत याचाच संदर्भ घेत बारामतीत आपला विजय का व्हायला हवा ते सांगितले.
शरद पवार राजकारणापासून दूर राहिले तर काम कोण करणार? हाच पठ्ठ्या काम करणार. दुसऱ्याचा घास नागी. आले नाणे खणखणीत आहे. मी आणखी १० वर्षे काम करणार असल्याचे अजित पवारांनी सांगत एकप्रकारे आपलीही निवृत्ती जाहीर करून टाकली आहे.
फलटणचे नेते म्हणतात की त्यांना फलटणचा बारामती करायची आहे. पण त्यांना सांगतो बारामती करणे एवढे सोपे नाही. बारामतीचा आमदार पहाटे पाच वाजता उठतो आणि सहा वाजता कामाला लागतो. तिथले रस्ते, इमारती या क्वालिटीच्या असतात. नाहीतर ब्लॅक लिस्टच करतो. इथे कसले काम चालते ते माहिती नाही, श्रीमंतांना विचारावे लागेल, असे अजित पवार म्हणाले.