विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले असताना उमेदवार आपल्या स्पर्धक उमेदवाराला पाठिंबा देऊ लागले आहेत. अमरावतीत महाशक्तीच्या उमेदवाराने मविआच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर नाशिकच्या नांदगाव मतदारसंघामध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. सोनावला यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा दिला आहे. सोनावाला यांनी भर सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज ठाकरेंना नाशिकमध्ये हा सलग दुसरा धक्का आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक विधानसभा मतदारसंघात मुर्तडक निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र त्यांच्या ऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज होते.
अमरावतीत चाललेय काय? परिवर्तन महाशक्ती आघाडी मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अबरार यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. यावर खळबळ उडालेली असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाने कोणताही पाठिंबा जाहीर केला नसून आगामी काळात पक्ष प्रमुख बच्चू कडू यावर निर्णय घेतील. अबरार यांचा तो वैयक्तीक निर्णय असल्याचे प्रहार पक्षाला जाहीर करावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. अबरार यांच्या कुटुंबियांना अज्ञातांनी धमक्या दिल्यात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भीतीमध्ये होते, असाही दावा प्रहारचे प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने यांनी केला आहे.