आई वडिलांनी दिलेले नाव निवडणूक आयोग कसे काय दुसऱ्याला देऊ शकतो. शिवसेना हे नाव माझे आहे. मी शिवसेनाच वापरणार. वाटले तर चिन्ह द्या, तो अधिकार तुमचा आहे. पण नाव माझे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा उरफाटा निर्णय मी मान्य करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत ठणकावले.
महाविकास आघाडीचे राजापुर विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन साळवी आणि रत्नागिरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेंद्रनाथ माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे रत्नागिरीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
ठाकरे यांनी शिंदे सेनेचे उदय सामंत यांचा भूत असा उल्लेख केला. २०१४ मध्ये सामंत यांनी मी निवडून येतो, मंत्रिपद देणार का असे विचारलेले, तेव्हा मी त्यांना शब्द दिलेला. २०१४ मध्ये देऊ शकलो नाही. परंतू, २०१९ मध्ये मला तो दिलेला शब्द आठवला आणि मी त्यांना मंत्री केले. उदय सामंत यांनी गद्दारी केली, तिकडे उद्योग मंत्री झाले. त्यांनी जिल्ह्यात किती उद्योग आणले असा सवाल करत ठाकरेंनी उदय सामंतांचे घरातील सोडा बाहेरील किती उद्योग आहेत, असा टोला लगावला. याचबरोबर ठाकरे यांनी राजन साळवींविरोधात उभे असलेल्या किरण सामंत यांना पैशाची मस्ती असल्याची टीका केली. पार अगदी मुंबईतही या लोकांनी बॅनर लावलेले, असे म्हटले.
शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्हावर सर्वोच्च न्यायालयाने ८ नोव्हेंबरला तारीख दिली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली आहे. आता तरी न्याय द्यावा, अडीज वर्षे झाली आम्ही न्याय मागत आहोत, उद्याच्या तारखेला निकालच द्या, सुनावणीची बतावणी नको, त्यापेक्षा पुढील तारीख देऊन टाका अशी हात जोडून न्यायमूर्ती चंद्रचूड यांना विनंती करत असल्याचे ठाकरे म्हणाले. न्याय फक्त मलाच नको तर देशाच्या लोकशाहीला हवा आहे, असेही ठाकरे म्हणाले.