शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:38 PM2024-11-05T17:38:26+5:302024-11-05T17:38:56+5:30
Shahu Maharaj On Satej Patil: माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत.
कोल्हापुरात मधुरिमा राजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. शाहू महाराज छत्रपती हे मधुरिमाराजेंना त्यांच्यासमोर सही कर असे सांगताना व्हिडीओत दिसत होते. तर सतेज पाटील मला तोंडघशी का पाडलात, लढायचे नव्हते तर आधीच सांगायचे होते, हे बरोबर नाही महाराज असे म्हणताना दिसत होते. यावरून सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अपमान केला व शाहू महाराज काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देणार असे बोलले जात होते. यावर शाहू महाराजांनी निवेदन जारी केले आहे.
काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही, असे शाहू महाराजांनी स्पष्ट केले. तसेच एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव कॉंग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती, असेही ते म्हणाले.
याचवेळी लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला, असे महाराज म्हणाले.
सतेज पाटलांनी अपमान केला का...
सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो. असे शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.
खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा...
विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे, असेही शाहू महाराजांनी स्पष्ट केले.