अजित पवारांची मोठी खेळी! नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला; भाजपचा विरोध तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:30 PM2024-10-29T12:30:22+5:302024-10-29T12:31:25+5:30
Nawab Malik got AB Form: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे दुपारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर होणार आहेत. मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
दाऊदशी संबंध असल्यावरून, मनी लाँड्रिंगप्रकरणात महाविकास आघाडीच्या सरकारवेळी भाजपानेनवाब मलिक यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली होती. आता तेच नवाब मलिक तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर भाजपासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या अजित पवारांच्या गोटात बसले होते. यंदाच्या निवडणुकीत मलिक यांना तिकीट देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे अजित पवारांनी मलिक यांच्या मुलीला अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली होती. परंतू, तिने उमेदवारी अर्ज भरताच आज शेवटच्या दिवशी अजित पवारांनी मलिकांना एबीफॉर्म दिल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे दुपारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर होणार आहेत. मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांनी एबी फॉर्म दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याचे वृत्त दिले आहे.
यामुळे मलिक आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होतात की अजित पवार या जागेवर अन्य कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एबी फॉर्म देऊन अजित पवारांनी मलिक यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहेत. आता अजित पवार भाजपसोबत काय चर्चा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फॉर्म A आणि B म्हणजे काय?
निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार नामांकन दाखल करताना 'फॉर्म A' आणि 'फॉर्म B' वापरतो. हे दोन्ही फॉर्म उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेतील आवश्यक माहिती पुरवतात. फॉर्म A हा राजकीय पक्ष वापरतात जे त्यांच्या उमेदवारांना नामनिर्देशित करण्यासाठी निवडणूक आयोगाला माहिती देतात. या फॉर्ममध्ये राजकीय पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह आणि उमेदवाराचे नाव समाविष्ट आहे.