मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून जरांगेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. यावर जरांगेंनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. फडणवीसांचे ऐकून तुम्ही या लफड्यात पडू नका, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
"हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला माहिती आहे. जे जे तुम्हाला येऊन सांगताहेत ना की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आले की पहिल्यांदा विचारा कसं? मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं जा, दिलं आरक्षण! म्हणजे काय? तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का? कोणतंही राज्य सरकार देऊ शकतं का?'' असे राज ठाकरे म्हणाले होते. तसेच जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा", असा सवाल राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना केला होता.
यावर जरांगे यांनी तुम्ही माझ्या नादी लागू नका, यानंतर तुम्ही आरक्षण विषयावर बोलू नका, हे रागारागाने सांगत नाहीय, असे राज ठाकरेंना म्हटले आहे. मराठा समाजाचे अस्तित्व कसे वाढवायचे हे मला चांगले माहिती आहे. तुमच्यासारखे अस्तित्व गमावणारा मी नाही, असा टोलाही जरांगे यांनी लगावला आहे.
येत्या १० नोव्हेंबरला मी समजाला काय सांगायचे ते सांगणार आहे. हा समाज काहीही करू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमची भूमिका समजेलच. मतदानाच्या दोन दिवस आधी जरी आम्ही सांगितले तरी सर्व समाज समजून जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.