अजित पवार माझ्याशी बोलत नाहीत. अजित पवार सांगतात की त्यांना व्हिलन बनविले गेले, मग त्याच अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री पद दिले गेले, एवढे लाड पुरविले गेले. माझी खूप इच्छा आहे अजित पवारांना प्रश्न विचारण्याची परंतू ते बोलतच नाहीत, त्यामुळे मला हा प्रश्न विचारता येणार नाही, असे सुळे म्हणाल्या. तसेच विधानसभेला पवारांच्याच कुटुंबातील उमेदवार का दिला, या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली ते सांगितले.
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. अजित पवारांकडे पर्याय नव्हता, म्हणून ४० आमदार त्यांच्यासोबत गेले या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की शरद पवारांना पर्याय नव्हता हे सांगणे किती हास्यास्पद आहे. त्या माणसाने ८० व्या वर्षी पक्ष काढला आणि लढतोय, असे म्हटले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते, दुसऱ्याला केले असते तर काहीच झाले नसते. पण शरद पवारांचे अजित पवारांवर प्रेम होते, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली यावर सुळे म्हणाल्या की, बारामतीतून कोणी ती जबाबदारी घेतली नाही. मला आनंद झाला असता जर कोणी ती घेतली असती तर. परंतू बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही. युगेंद्र दीड वर्षांपासून काम करत होता. यामुळे त्याला उमेदवारी देण्यात आल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात मी लढले ती काही कौटुंबिक लढाई नव्हती ती वैचारिक लढाई होती, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
विधानसभेचे उमेदवार निवडताना इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीशी काही समस्या नाही हा निकष लावल्याचे सुळे यांनी सांगितले. शरद पवार भाजपासोबत जायचे असते तर कधीच गेले असते. कोणी थांबवले असते, असा सवाल सुळे यांनी सध्या होत असलेल्या चर्चांवर केला. जागावाटपातील वादावरून कटुता टाळता आली असती का या प्रश्नावर सुळे यांनी सांगितले की एवढ्या मोठ्या आघाडीत लोकशाही होती. जे आमच्याकडे झाले ते त्यांच्याकडेही झाले. अदृश्य शक्तीने एवढे पक्ष निर्माण केलेत तो गढूळपणा कुठेतरी खाली बसायला लागेल, असे सुळे म्हणाल्या.
जयंत पाटील, रोहित पवारांमध्ये सुप्त संघर्ष?जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त संघर्ष आहे का या प्रश्नावर त्यांच्यात जनरेशन गॅप आहे. यामुळे त्यांच्याच वाद कसा असू शकतो. मी संघटनेत काम करते. मी आत्या घरी, मी त्यांना रोहित पवार म्हणूनच पाहते. नाते पाहून हळवे झालो तर लीडरम्हणून चुकीचे ठरेल. लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायला हवे, असे सुळे यांनी सांगितले.
यंदाची विधानसभा ही राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी नाही तर महायती विरोधात महाविकास आघाडी अशी लढाई आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेची शेवटची यादी ही भाजपाचे लोकांची आहे. भाजपा जवळपास १७५ जागा लढतेय, असे सुळे म्हणाल्या. गेल्या काही वर्षांत सगळेच सत्ताधारी झाले सगळेच विरोधक झाले यावर जनता स्पष्ट बहुमत देणारे मतदान करेल असा अंदाज सुळे यांनी व्यक्त केला.
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर मला ज्यांच्याकडून अपेक्षा नाहीत त्यांच्याकडून वाईट वाटत नाही. पण भाजपाचे वाईट वाटते. भाजपाचे विरोधक असले तरी सुसंस्कृत होते. ओरिजिनल भाजपा सुसंस्कृत आहे. फडणवीस मुळचे भाजपाचे. भाजपा २.० ही वाईट आहे, असे सुळे यांनी मत व्यक्त केले. फडणवीसाकडून खूप अपेक्षा होत्या. खोत बोलले तेव्हा ते व्यासपीठावर होते, ते काही बोलले नाहीत याचे वाईट वाटते, असे सुळे म्हणाल्या.