भिवंडी: एकीकडे राज ठाकरे यांची शिवाजीपार्कवरील सभा रद्द झाल्याने मनसैनिक नाराज असताना आज भिवंडीतील सभाही राज यांच्या भाषणाविनाच झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी ग्रामीणच्या उमेदवार वनिता कथोरे, भिवंडी पूर्वचे उमेदवार मनोज गुळवी, शहापूरचे उमेदवार हरिश्चंद्र खांडवी, विक्रमगडचे उमेदवार सचिन शिंगडा यांच्या प्रचारार्थ भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर शुक्रवारी ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, अस्वस्थ वाटत असल्याकारणाने राज ठाकरेंनी व्यासपीठावर न जाता थेट मनसे कार्यकर्ते व महिला सैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटे बोलून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत हे उमेदवार विजयी झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी नक्की परत येईल, असे आश्वासन त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले.
शिवाजी पार्कचीही सभा होणार नाही...प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान राज ठाकरेंच्यामनसेला मिळणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा गटाला मिळणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर या सभेसाठी मनसेला परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु सभेला परवानगी मिळूनही १७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आले. मनसेने उद्धवसेनेच्या आधी अर्ज केल्याने त्यांना ही परवानगी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. पण परवानगी मिळण्यास खूप उशीर झाला असून तयारीला पुरेसा वेळ मिळणार नसल्याने ही सभा घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.