मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:59 PM2024-11-05T19:59:56+5:302024-11-05T20:04:31+5:30
अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात आता भाजपा आणि मनसेची ताकद उभी ठाकणार आहे.
अर्ज माघारीनंतर अनेक मतदारसंघांत बंडखोरी कायम राहिल्याने मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांत धाकधूक निर्माण झाली आहे. मावळ मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रावादीला सुटला तरी उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी राजीनामा दिला होता. अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या बापू भेगडे यांना मनसेने पाठिंबा दिल्याने अजित पवारांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मावळमधील लढतीबाबत राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या भेगडे यांना पाठिंबा देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी काढले आहेत. मनसे जाहीर पाठिंबा देत असून मावातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी असे या पत्रकात म्हटले आहे.
तर दुसरीकडे सुनील शेळके यांच्या उमेदवारीला मावळमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी देखील विरोध केला आहे. बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. येणार्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळकेंचा पराभव करणे आणि बापू भेगडे यांना निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार माजी मंत्री बाळा भेगडे यांनी घेतला आहे. यामुळे अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात आता भाजपा आणि मनसेची ताकद उभी ठाकणार आहे.
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मावळ विधानसभेतील उमेदवार अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा जाहीर केला आहे.#विधानसभा_२०२४pic.twitter.com/NIAQR8AhW6
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 5, 2024