माजी मुख्यमंत्री व मविआचे नेते उद्धव ठाकरेंची सलग तीन दिवस तपासणी करण्यात आली आहे. दोनवेळा हेलिकॉप्टरमधून उतरताना आणि एकदा गोवा-महाराष्ट्र सीमेवर ठाकरेंची तपासणी करण्यात आली. पहिल्या दोन तपासणीवेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची शाळा घेत मोदी, शाह यांच्या बॅगा तपासा आणि त्याचे व्हिडीओ पाठवा असे सांगितले होते. यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होऊ लागताच आज एकाच दिवसात महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.
आज सकाळी अजित पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. या बॅगेत चकल्या सापडल्यावर अजित पवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना त्या खाण्यास सांगितले. तर दुपारी पालघरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालघर नंडोरे येथील हेलिपॅडवर आले. यावेळी त्यांच्या बॅगची तपासणी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या बॅगेत कपडे आहेत, युरिन पॉड वगैरे काही नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंची खिल्ली उडविली. तर काटोल येथे हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.