माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सावंतवाडी, कुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचारसभा घेतली. सिंधुदूर्गमध्ये प्रवेश करतानाच ठाकरेंची गाडी तपासण्यात आली. यानंतर ठाकरेंनी सावंतवाडीत प्रचारसभा घेत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यानंतर सायंकाळी कणकवलीतकुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे पिता पुत्रांवर टीका करताना मोदींवरही टीका केली.
इकडे येऊन काश्मीरचे ३७० कलम काढले म्हणून सांगायची गरज काय असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला, कापसाला कधी भाव देताय ते बोला, असेही ठाकरेंनी मोदी शाहांना सुनावले. याचबरोबर मोदींनी आज आमच्या व्यासपीठावर येऊन घराणेशाहीवर बोलावे असे आवाहन करत असल्याचे ठाकरे म्हणाले.
मोदी घराणेशाहीवर बोलतात, उद्धव ठाकरे यांना नको आणि बाप डोक्यावर व त्याची दोन मुले खांद्यावर घेऊन मिरवत आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली. बाळासाहेब ठाकरेंनी, शिवसैनिकांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर दिली तर तुम्ही कसली ढवळाढवळ करत आहात, असा सवालही ठाकरेंनी केला.
सिंधुदुर्गात होत असलेली गुंडगिरी काही वर्षांपूर्वी तुम्हीच संपविली आणि चुकून खासदार म्हणून निवडून दिले. आता पुन्हा बाप आणि मुलांची दादागिरी सुरु होणार. आताच चूक सुधारली नाही तर बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल, असा इशाराही ठाकरेंनी कणकवली, कुडाळ मतदारसंघातील मतदारांना दिला.