मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर अध्यक्षांच्या दालनात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले होते. दरम्यान, आज सभागृहामध्ये आमदारांचे वर्तन तसेच सभागृहाचे पावित्र्य न राखता होणारी टिंगल टवाळी याबाबत अजित पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत असे वर्तन करणाऱ्या सदस्यांना खडेबोल सुनावले. अशा सदस्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. मात्र कुणाचे बारा बारा महिन्यांसाठी निलंबन होऊ नये, अशी विनंती अध्यक्षांकडे करत अजित पवार यांनी एकप्रकारे १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपाचे अप्रत्यक्षरीत्या समर्थनच केले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, सभागृहामध्ये काही घटना घडत असतात. त्यांच्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा करून मार्ग काढायचा असतो. मात्र जोपर्यंत अशा वर्तनाला रोखण्यासाठी काही नियम होत नाहीत, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाही. माझी विनंती आहे की, एखादा सदस्य चुकला तर त्याला चार तास बाहेर ठेवा, म्हणजे त्याला त्याची चूक लक्षात येईल. चार तास कमी वाटत असले तर दिवसभरासाठी निलंबित करा. मात्र बारा बारा महिन्यांसाठी कुणाला बाहेर पाठवू नका.
दरम्यान, सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या, सभागृहाच्या प्रथा-परंपरा न पाळणाऱ्या आमदारांचाही अजित पवार यांनी यावेळी समाचार घेतला. सभागृहात अनेक सदस्य नियम पाळत नाहीत. सभागृहात अध्यक्षांकडे पाठ करून नये, असा संकेत आहे. मात्र अनेकजण खुशाल गप्पा मारत असतात. येताना अध्यक्षांना नमस्कार करावा, जाताना नमस्कार करून बाहेर जाणं आवश्यक आहे. मात्र अनेक आमदारांनी नमस्कार करणं सोडून दिलंय, कुणीही कुठेही येऊन बसतं. किमान मुख्यमंत्र्यांचे आसन तरी सोडा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.