Maharashtra Assembly Winter Session: मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो! शिवसेना नेते दिवाकर रावतेंची घोषणाबाजी; अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:50 PM2021-12-22T16:50:29+5:302021-12-22T16:55:25+5:30
Maharashtra Assembly Winter Session: शिवसेना नेते दिवाकर रावते घोषणा करू लागले; अजित पवारांनी मागे वळून पाहिले
मुंबई: विधिमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली नक्कल, त्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलेला आक्षेप, त्यावरून सभागृहात झालेला गदारोळ, जाधवांनी मागितलेली माफी अशा घडामोडींनी पहिला दिवस गाजला. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना, बेळगावातील मराठी भाषिकांवर होत असलेले अत्याचार यावरूनही विधिमंडळातलं वातावरण तापलं.
कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी घटनेचा निषेध नोंदवला. बंगळुरुत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होते. बेळगावात शांतपणे आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांना दडपलं जातं. त्यांच्यावर कारवाई होते. मात्र याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काहीच बोलत नाहीत, असं म्हणत शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
विधानसभेत पुढे बसलेले एकनाथ शिंदे कर्नाटक सरकारचा निषेध करत होते. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि त्याला तिथले मुख्यमंत्री क्षुल्लक घटना म्हणतात, असं शिंदे म्हणाले. तितक्यात शिवसेना आमदार आणि माजी मंत्री दिवाकर रावतेंनी घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, अशी घोषणा रावतेंनी दिली.
रावतेंच्या घोषणा ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागे वळून पाहिलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणा, अशी सूचना केली. त्यानंतर रावतेंना त्यांची चूक समजली. 'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो', अशी घोषणा मग रावतेंनी दिली.