मुंबई - राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यात नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. अधिकारी सरकारचे का ऐकत नाहीत, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यात अवकाळीने पीक गमावले. आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरी देखील चर्चा करू, असे सरकार मोघम उत्तर देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सरकारने एक रुपयाचा विमा उतरवला. फायदा कोणाचा झाला? पीकविमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा होणार. सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात सरकारवर हल्लाबोल केला. काही शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला परवानगी मागितली तरी सरकारला जाग नाही. राज्यातील शेतकरी पीक कर्ज परत करू शकत नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही. नाशिक पट्ट्यात पाऊस झाला द्राक्ष पीक वाया गेले. तिथे देखील शेतकऱ्यांना मदत नाही. नाशिक महामार्ग शेतकऱ्यांनी रस्ता रोको सुरू केला आहे. शेतकरी रस्त्यावर बसला आहे. शेतकरी कसा जगणार. व्यापाऱ्यांनी हात वर केले आहेत. हे लक्षात घेता यावर चर्चा करावी लागेल,अशी मागणी वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत केली. परंतु चर्चेची मागणी फेटाळल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला.