अजित पवार गटातील नेते नवाब मलिक यांना पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून सध्या महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. तसेच नवाब मलिक यांचे दाऊतशी संबंध असल्याचा आरोपांचा भाजपाच्या काही नेत्यांनी केला होता. त्याला आता नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना कायदेशीर नोटिस बजावणार असल्याचा इशाराच नवाब मलिक यांनी दिला आहे.
दाऊदशी संबंध जोडणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना इशारा देताना नवाब मलिक म्हणाले की, माझ्या प्रचाराला या, असा आग्रह मी करत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. जनतेच्या पाठबळाच्या आधारावर मी निवडणूक लढवत आहे. मात्र माझं नाव जे दाऊदशी जोडत आहेत. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. मी माझी विचारसरणी बदलणार नाही. माझी माझ्या विचारांशी बांधिलकी आहे, असेही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.
मागच्या वेळी अणुशक्तिनगर येथून विजयी झालेले नवाब मलिक या निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीला त्यांना अजित पवार गटाकडून एबी फॉर्म मिळार नाही, असं बोललं जात होतं. मात्र नवाब मलिक यांनी अखेरच्या क्षणी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान, या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर येथे महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे रिंगणात आहेत.