माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनाला आपण उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते. तसेच या सरकारते हे निरोपाचे अधिवेशन असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
मुंबईतील पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील. उद्या पासून महाराष्ट्रारातील विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. या सरकारच्या निरोपाचे हे अधिवेशन असणार आहे. मी देखील असणार आहे. खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरु होत आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.
यावर शिंदे यांनी अधिवेशन सुरु होऊ द्या कोण कोणाला निरोप देते हे समजेल, असे प्रत्यूत्तर दिले आहे. तसेच दरड प्रवण क्षेत्राचा सर्व्हे करणार असून संबंधित अधिकाऱ्यांना सर्व्हेचे आदेश दिले आहेत, असेही शिंदे म्हणाले. पावसाळ्यात देखील काम सुरु राहणार, आधुनिक तंत्राचा वापर करणार असून लँड स्लाईड थांबविणे जास्त महत्वाचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. तसेच राज्य सरकार २८ जून रोजी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या अधिनेशनामध्ये राज्यातील दुष्काळ आणि अन्य विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजणार असल्याची चर्चा आहे.