मुंबई : लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला सोमवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईत मात्र कडकडीत बंद होता. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. भाजपने हा बंद सरकारपुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका केली.
बंदच्या आयोजकांशी चर्चा करुन मुंबईत व्यापारी व दुकानदारांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. लोकल आणि मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती. मुंबईत काही ठिकाणी बेस्टच्या बसवर दगडफेक झाली. रिक्षा आणि टॅक्सी सेवा बाधित होती. पुण्यात नेत्यांनी बंद यशस्वी केला. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांनी राजभवनसमोर मौनव्रत आंदोलन केले. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर आदी तिथे उपस्थित होते.हुतात्मा चौकात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे आदींनी मोदी-योगी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. शिवसेना भवनसमोर आ. सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको झाला.
रिक्षाचालकांना मारहाणबंदमध्ये व्यापारी, रिक्षाचालकांसह इतर व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, यासाठी ठाण्यात शिवसैनिकांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बळाचा वापर केला. ठाण्यात उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना दंडुक्याने मारहाण केली.
देवेंद्र फडणवीसांचा ढोंगीपणा राज्याच्या शेतकऱ्यांच्या समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या हत्येचे भाजप समर्थन करत असेल तर ते निषेधार्ह आहे. भाजपने या बंदला विरोध केला. त्यासाठी भाजपचा निषेध व्यक्त करतो.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस