मुंबईः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेनंही या बंदला पाठिंबा जाहीर केला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा म्हणजे पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रातील चित्र आहे. ते चित्र पाहता राजकीय नेतृत्वाचं अपयश आहे. मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही, तर भाजपमध्येही सुरू असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला आहे.दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांनी या बंदमधून वगळलंय. तसंच कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिल्यात. परंतु मुंबई बंद यशस्वी करून दाखवण्यासाठी आंदोलकांनी दगड उचलल्याचं आणि रेल्वे अडवल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांच्या विशेष शाखेचा या आंदोलनावर वॉच असणार आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचाली सायबर सेलच्या रडारवर असणार आहेत. तर सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांकडून विभागातील बारीक हालचालींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच काही पोलीस साध्या वेशात या आंदोलनात सहभागी होत सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहेत. शहरातील सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियंत्रण कक्षही अलर्टवर आहे. सोशल मीडियाच्या हालचालींवर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.