मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri Incident) निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सरकारने 'महाराष्ट्र बंद' (Maharashtra Bandh) ची हाक दिली आहे. राज्यभरात बंदला प्रतिसाद मिळत असून, काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यातच आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारचा आजचा बंद स्टेट स्पॉन्सर्ड दहशतवाद असून, त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का, असा थेट सवाल केला आहे.
या सरकारचे नाव बंद सरकार आहे, हे सत्तेत आल्यानंतर यांनी योजना बंद केल्या, शेतकऱ्यांची अनुदाने बंद केली, कोरोना काळात देश उघडा होता, महाराष्ट्र बंद केला, आमचे छोटे दुकानदार, व्यावसायिक यांचे गाडे रुळावर येत असताना सरकारने बंद केला. धमक्या देऊन हा बंद केला जात आहे. एकूणच आजचा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवादासारखा आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नैतिकता असेल तर शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करतील
या सरकारला थोडी नैतिकता असेल तर महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादे पॅकेज घोषित करतील अन्यथा यांचा ढोंगीपण अजून उघड होईल, असा निशाणा साधत, महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजार आणि ५० हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटे आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हा ढोंगीपणाचा कळस
महाविकास आघाडी सरकारच्या घटकपक्षातील लोक म्हणतात की, पूर्वी भाजप सरकार मदत करत होते, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय, ते मदत करायला तयार नाहीत. त्यामुळे आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. ही तीच मंडळी आहेत, मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आणखी वाचा: आजचा बंद म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नेमकं कारण