मुंबई - केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. बंदला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचा दावा आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यात एकूण ३५ संघटना सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. कुटुंब जसं आर्थिक परिस्थितीत अडकलं तर त्याला नामुष्की येते तसं देशाची परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारचे ८ ते ९ लाख कोटी कमी होणार आहे. त्यामुळे सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे. त्यांना जाग आणावी, देशाचं नाक कापलं जाणार नाही याची दक्षता घेतली, लोकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं अन्यथा सरकार मनमानी पद्धतीने वागेल असं त्यांनी सांगितले आहे.
या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. चेंबूर, सोलापूर येथे बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. तर वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
- महाराष्ट्र बंद 4 वाजता मागे घेणार, बंदला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार - प्रकाश आंबेडकर
- बंददरम्यान आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून कुठेही हिंसाचार नाही - प्रकाश आंबेडकर
- भाजपानं विरोध करुनही महाराष्ट्र बंद यशस्वी - प्रकाश आंबेडकर
- वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान शहरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. यादरम्यान दुपारी १२.३० च्या सुमारास इर्विन ते डफरीन मार्गावर दुकाने बंद होत असताना एका जणाने दुकानाच्या दिशेने दगड भिरकावला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
- बदलापूर येथे रस्त्यावर उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्यासह मिलिंद वानखेडे, मनोज तायडे, किसन कांबळे, गायक संजय गायकवाड, सिध्दार्थ डोळस साहेब यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- सीएए आणि एनआरसीविरोधात सोलापूरात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मूकमोर्चा
- छगन मिठा पेट्रोल पंप चेंबूर येथे आंदोलक रस्त्यावर
- महाराष्ट्र बंद हा स्वयंस्फुर्तीने लोकांनी केला आहे. कोणत्याही प्रकारचा कर्फ्यू लागू होणार नाही, बंद शांततेत पार पडेल याची खबरदारी घेण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केलं.
- महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
- डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र बंदनिमित्त वंचितच्या कार्यकर्त्यांनी काढली रॅली
- औरंगाबादमध्ये सिटीबसवर दगडफेक, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
- मनमाडमध्येही वंचितच्या कार्यकर्त्यांकडून बाजारपेठ बंद
सोलापूरातही वंचितच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यात आला आहे
मुंबईत नाक्यानाक्यावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे