कोल्हापूर : आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे दिला.
कोल्हापूरात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर यल्गार सभेत ते बोलत होते.दसरा चौकात सकाळी नऊ वाजल्यापासूनच युवक गावागावातून हातात भगवे झेंडे घेतलेले युवक मोटारसायकल वरुन यायला सुरुवात झाली.सकाळी अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर चार वीरमातांच्या हस्ते आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, शाहू गौरवगीत, महाराष्ट्र गीत व मराठा आरक्षण गीताने जाहीर सभेचा प्रारंभ झाला.
अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. प्रमुख उपस्थिती महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुडकर, माजी आमदार मालोजीराजे, समन्वयक दिलीप देसाई, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील आदींची होती.
निर्वाणीचा इशाराचार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, असा निर्वाणीचा इशारा या जाहीर यल्गार सभेत मराठा नेत्यांनी दिला.