Lakhimpur Kheri Violence: 'अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे', शिवसेनेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:32 AM2021-10-11T08:32:01+5:302021-10-11T08:37:36+5:30
Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर खेरीमधील घटनेबद्दल भाजप खासदार वरुण गांधी बोलले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे का?'
मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Violence) येथं केंद्रीय मंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा याने कथितरित्या शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर मोठा हिंसाचार उफाळून आला होता. त्या हिंसाचारात चार शेतकरी आणि एका पत्रकारासह आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यातील महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) सरकारने 'महाराष्ट्र बंद'(Maharashtra Bandh) पुकारला आहे. या बंदमध्ये सहभागी होऊन अन्नदात्यांचे ऋण फेडण्याचे आवाहन शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
अग्रलेखात म्हटलंय की, 'लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबद्दल ज्या असंख्य लोकांना वरुण गांधींप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करता आल्या नाहीत, अशा सगळ्यांसाठी आजचा 'महाराष्ट्र बंद'(Maharashtra Bandh) आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य ठामपणे उभा आहे. बांधावर जाऊन शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवायचा, पण चार शेतकऱ्यांना भाजपच्याच मंत्रिपुत्राने चिरडून मारले त्या कृत्याचा साधा निषेधही करायचा नाही, अशी राज्याच्या विरोधी पक्षाच्या वागण्याची तऱ्हा आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा हा 'महाराष्ट्र बंद' आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे.'
केंद्राकडून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न
'देशभरात नवरात्री जागवल्या जात आहेत. कोरोना काळात धार्मिक उत्सव, सण साजरे करण्यावर कठोर निर्बंध सुरू आहेत, पण शेतकऱ्यांवरील अन्यायावर कोणतेच निर्बंध दिसत नाहीत. बेबंद, बेफामपणे शेतकऱ्यांना चिरडणे-भरडणे आणि ठार मारणं सुरुच आहे. खीमपूरात मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद'(Maharashtra Bandh)चा पुकार केला आहे.'
इतर राज्यांनी बंदचे अनुकरण करावे
'शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा आहे. इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलं पाहिजे. लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. 'जय जवान, जय किसान' हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. दोन वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे. गाझीपूरच्या सीमेवर तो ऊन, वारा, पावसात बसला आहे. या काळात चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान झाले.
शेतकऱ्यांनी वरुण गांधींचे अभिनंदन करायला हवे
'भारतीय जनता पक्षाच्या खासदार वरुण गांधींनी घटनेचा निषेध केला. तेव्हा वरुण गांधी(VArun Gandhi) आणि त्यांच्या आई मनेका गांधी(Maneka Gandhi) या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं. वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले? वरुण गांधी हे धाडसाने बोलले. इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील,'असे मत सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलंय.