मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Violence) इथं झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) सरकारने 'महाराष्ट्र बंद'(Maharashtra Bandh) पुकारला आहे. या बंदविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut)यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय.
रस्त्यावर उतरुन दाखवावं...माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, 'शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो, त्यामुळेच हा बंद आहे. हा आजचा महाराष्ट्रातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत. आमचा बंदला पाठिंबा नाही अशी कोणी राजकीय विधान करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे नागरिक आहोत का?, या देशातील शेतकऱ्यांचे देण लागतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा. लखीमपूर खेरीत मंत्रीपुत्राने त्याच्या थार गाडीने शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अशी कुणाकडे एखादी गाडी असेल तर त्याने रस्त्यावर आणावी, रस्त्यावर उतरुन दाखवावं', असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.
शेतकरी अपेक्षेने आपल्याकडे पाहत आहेतदेशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत, यादरम्यान 400 पेक्षा जास्त शेतकरी मरण पावले. भाजपची सत्ता असलेल्या हरीयाणात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण एक दिवस बंद पुकारणार नसू तर जय जवान जय किसान या घोषणेला काहीच अर्थ नाही, असंही राऊत म्हणाले.