मुंबई - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बंदवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आजचा बंद म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंदमुळे मविआ सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. कारण लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बांधावर जाऊन मदतीची आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने हवेत विरली.
आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. कारण याच मंडळींनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचं आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का. खरंतर लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार त्यावर कारवाई करत आहे. हा बंद हा त्या घटनेबाबत सहानुभूती व्यक्त करण्यासाठी नाही आहे तर त्यावर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने केलेला बंद आहे. म्हणूनच लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे. मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करून, धमक्या देऊन राज्यातील लोकांना बंद पाळण्यासाठी भाग पाडलं जात आहे. तसंही हे बंद सरकार बंद सरकार आहे. योजना, अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश सुरू असताना महाराष्ट्र बंद केला होता. आता काही सुरू होत असताना सरकारने बंद पुकारला, असा टोला फडणीवस यांनी लगावला.
खरंतर उच्च न्यायालयाने एका निर्णयानुसार बंद पुकारणे बेकायदेशीर ठरवलेले आहे. त्यामुळे न्यायालयाने या बंदची दखल घ्यावी. तसेच बंदमधील नुकसानीची भरपाई सरकारकडून वसूल करण्यात यावी. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बंदचा निर्णय घेतला, ही घटनेची पायमल्ली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.