बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनी काका शरद पवार यांच्यावर मात केली आहे. लोकसभेला ताई, विधानसभेला दादा हे समीकरण बारामतीकरांनी यावेळीही पाळले आहे. शरद पवारांनी अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उभे केले होते. परंतू, तिथे त्यांची डाळ शिजू शकली नाही. अजित पवारांनी विरोधात वातावरण असुनही मोठे मताधिक्य कसे घेतले, असा संशय शरद पवार गटाला असून युगेंद्र पवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी गावोगावी जात मतदारांचे आभार मानायला सुरवात केली आहे. काटेवाडी गावातून या आभार दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली आहे. ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्यांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेले पाहिजे आभार मानले पाहिजेत हीच शिकवण शरद पवार यांची आहे. त्यासाठी हा आभार दौरा करत असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटले आहे.
तसेच मतपडताळणी अर्जावर ते म्हणाले की, महाराष्ट्रात संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक दिग्गज कधीही न हरणारे नेते तिथे हरले आहेत. हे का झालं? सुप्रिम कोर्टाने आम्हाला हा अधिकार दिला आहे तर मग मत पडताळणी करायला काय हरकत आहे. अजित पवार म्हणतात की लोकसभेनंतर लोकांचा कल बदलला यावर बोलताना युगेंद्र यांनी म्हटले की लोकांचा खरोखरचाच कल असेल तर तो स्वीकारावा लागेल. पण नक्की ते का झाले? कशामुळे झाले? कुणामुळे झाले? याचा अभ्यास केला पाहिजे.
अजित पवारांचे विजयावर अभिनंदन केले का, यावर युगेंद्र पवारांनी अजून मी त्यांचे अभिनंदन करू शकलो नाही. उद्या जर का तेभेटले तर नक्की करेन, असे सांगितले.