मुंबई : उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत देवेंद्र फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरत असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले आहेत. महाराष्ट्रगुजरातपेक्षाही मागे पडला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे पत्र परिषदेत केली.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशनने जाहीर केलेली आकडेवारी नमूद करून चव्हाण म्हणाले की, २०१६ मध्ये कर्नाटकात १ लाख ५४ हजार १७३ कोटी, गुजरातेत ५६ हजार १५६ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. तर या तुलनेत महाराष्ट्रात केवळ ३८ हजार १९३ कोटी रूपयांचेच प्रस्ताव आले. २०१७ मध्येही कर्नाटकात १ लाख ५२ हजार ११८ कोटी रु, गुजरातमध्ये ७९ हजार ६८ कोटींचे प्रस्ताव आले. तर महाराष्ट्र अवघ्या ४८ हजार ५८१ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावासह तिस-या क्रमांकावर राहिला. सप्टेंबर २०१८ अखेर कर्नाटकात ८३ हजार २३६ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले असून गुजरात राज्यात ५९ हजार ८९ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. तर महाराष्ट्रात यंदा केवळ ४६ हजार ४२८ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कर्नाटक आणि गुजरातच्या तुलनेत फार कमी गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. पूर्वी गुजरात महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पिछाडीवर असायचा. परंतु, विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणाचा गुजरात लाभार्थी असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.
संभाजी भिडेंना राजाश्रयभीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सुत्रधार संभाजी भिडे होते असा आरोप करून चव्हाण म्हणाले की, भिडे आणि त्यांच्या साथीदारांवरील दंगलीचे ६ गुन्हे सरकारने मागे घेतले. भिडेंवरील गुन्हे मागे घेणा-या सरकारने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-या तरूण तरूणींवरील गुन्हे आश्वासन देऊनही मागे घेतले नाहीत. भिडेंना राजाश्रय दिला जात आहे. हे गुन्हे मागे का घेतले नाहीत? याचे उत्तर सरकारने द्यावे असे चव्हाण म्हणाले.चव्हाणांचे अज्ञान अनपेक्षित : सुभाष देसाईकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महाराष्ट्राची बदनामी का करू इच्छितात? माजी मुख्यमंत्री म्हणून नाही तर माजी उद्योगमंत्री म्हणून इतके अज्ञान चव्हाण यांचे असेल, याची अपेक्षा आम्ही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्र परिषदेत दिली. देसाई म्हणाले की, देशात येणाºया एकूण गुंतवणुकीत तर महाराष्ट्र आघाडीवर आहेच, शिवाय, गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्ष गुंतवणुकीत परावर्तित होण्यात सुद्धा महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट होते.