Raj Thackeray Reaction on Maharashtra Bhushan Award Controversy: राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. त्यापैकी काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील १२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर केली असून उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यातील उपचार सुरू असलेल्या रूग्णांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामोठे येथील MGM रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी सरकारवर टीका करताना, राजकीय स्वार्थासाठीच ही गर्दी जमवण्यात आली.
"राज्य सरकारला घडलेला प्रसंग टाळता आला असता. सकाळी कार्यक्रम करणं गरजेचं नव्हतं. राजभवनावर बोलावून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देता आला असता. पण सध्या झालेली गोष्ट ही दुर्दैवीच आहे. कार्यक्रम सकाळी न करता संध्याकाळी झाला असता तर हे टाळता आलं असतं. मात्र कोणीही हे मुद्दामून केलेलं नाही. इतरांना जसा पुरस्कार देतात, तसंच राजभवनावर बोलवायला हवं होतं असं मला वाटतं. या कार्यक्रमामागे राजकीय स्वार्थ असल्याशिवाय एवढी माणसं बोलवली जातात का?
"मी हॉस्पिटलला गेलो. तिथे जी लोकं होतं त्यांना भेटलो. ICU मध्ये बरीच लोकं आहेत, तिथे मी गेलो नाही. ICU मध्ये जायचं नसतंच. कारण त्या लोकांची अवस्था नाजूक असते. मी हॉस्पिटलमधील स्टाफशी बोललो. ७१ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दोन जण दगावलेत, पण हॉस्पिटलमधील सर्व लोक त्यांचं काम करत आहेत," असेही राज ठाकरे म्हणाले.