- वैभव गायकरपनवेल : मी १२ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. इतिहासाचा विद्यार्थी राहिलो आहे. देश-विदेशातील इतिहासाचा मी अभ्यास केला आहे. अनेक कुटुंबांवर माता सरस्वती, लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो. त्यानुसार ती कुटुंब वाटचाल करतात. मात्र, समाजसेवेचा वारसा तब्बल तीन पिढ्या जोपासणारे धर्माधिकारी कुटुंब मी पहिल्यांदाच पाहत असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी रविवारी काढले. खारघर येथे २०२२ या वर्षाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वितरित केल्यानंतर ते बोलत होते. शाह यांच्या हस्ते आप्पासाहेबांना पुरस्कार वितरित करण्यात आला. २५ लाखांचा धनादेश, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या सोहळ्याला केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
कोणताही प्रसिद्धीचा लवलेश न ठेवता आप्पासाहेब धर्माधिकारी आपले सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या समाजसेवेच्या सन्मानार्थ जमलेली गर्दी हे त्यांच्या कार्याचा गौरव असून, अशी लाखोंची गर्दीदेखील मी माझ्या आयुष्यात पाहिली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.आप्पासाहेबांच्या सन्मानासाठीच मी थेट दिल्लीवरून याठिकाणी दाखल झालो असल्याचे शाह म्हणाले.
या सोहळ्याला जवळपास लाखाेंचा जनसमुदाय लोटला. अतिशय शिस्तबद्ध नियोजनात श्री सदस्यांचेदेखील अमित शाह यांनी कौतुक केले. महाराष्ट्राला महापुरुषांचा वारसा लाभला असल्याचे सांगून आप्पासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या अनुयानांनादेखील एकप्रकारे सन्मानित केले आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाचेदेखील शाह यांनी कौतुक केले.
महाराष्ट्राच्या तीन विचारधारामहाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्याचे सांगून महाराष्ट्र हे राज्य तीन धारेत नेहमी वागत आले आहे. यात पहिल्या धारेत शिवाजी महाराजांच्या वीरतेचे उदाहरण देत त्यांचे कार्य वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू आणि लोकमान्य टिळकांचे नाव घेतले. दुसरी विचारधारा भक्तीची असून, यात समर्थ रामदास, तुकाराम महाराज, संत नामदेव यांचे मोठे योगदान आहे, तर तिसरी धारा सामाजिक चेतनेची असून, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी ती जोपासली आहे. सामाजिक चेतना जपण्याचे हेच महानकार्य आप्पासाहेबांनी पुढे चालविले असल्याचे शाह म्हणाले.
जीवात जीव असेपर्यंत मानवता धर्माचे काम नवी मुंबई : मानवता धर्म श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाच्या मनात रुजायला हवा. त्यासाठीच आमचा हा खटाटोप आहे. नानासाहेबांनी ८७ वर्षांपर्यंत काम केले. आता जीवात जीव असेपर्यंत, श्वास चालेपर्यंत हे काम मी पुढे सुरू ठेवणार आहे. माझ्यानंतर उत्तराधिकारी म्हणून सचिनदा धर्माधिकारी तुम्हाला परिचित आहेत. तोही हे कार्य अखंडपणे करणार आहे. कार्य चालू राहते. कार्य श्रेष्ठ आहे. कार्य उत्तम असेल, तर देहाला सन्मान मिळत असतो, असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित आहे. कोणताही पुरस्कार उच्च असतो. आज समाजाचे, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. ते फेडण्यासाठी आपण काय केले? आपण त्यांची काय सेवा केली? हे फार महत्त्वाचे आहे. समाजाची सेवा करण्यासाठी काय करावे लागते? हेच आम्ही सांगत असतो. प्रत्येकाने अखंड सेवा करायला पाहिजे. फक्त बोलून होत नाही, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. गृह आणि सहकार ही खाती महत्त्वाची असूनही ते आपल्या सर्वांसाठी इथे हजर राहिले आहेत. हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला गेला. कारण कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणे हे महाराष्ट्रात कुठेच झालेले नाही. हे राज्य सरकारने केलेले एक महान कौतुक आहे, असे आप्पासाहेब धर्माधिकारी यावेळी म्हणाले.
पाच तरी झाडे लावाश्री सदस्यांनी आता येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकी पाच झाडे लावावीत. झाडांची लावगड करून त्याचे संवर्धनही करावे, असे आवाहनही आप्पासाहेबांनी केले.पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री निधीसाठी आपल्या सामाजिक दातृत्वाची प्रचिती देताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारात मिळालेली २५ लाखांची रक्कम मुख्यमंत्री निधीसाठी सुपुर्द करून माणुसकीचे दर्शन घडविले. या घोषणेचे श्री सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
कार्यक्रमानंतर दुर्दैवाने उष्माघाताचे आठ बळीपनवेल : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी आलेल्या शेकडो श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन भोवळ आल्याच्या घटना घडल्या. त्यात आठ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी राज्यभरातून लाखो लोक खारघर येथे आले होते. दुपारी दीड दोन वाजेपर्यंत हे लोक मैदानात होते.
अनेकांनी भर उन्हात कार्यक्रम ऐकला आणि नंतर थंड पाणी पिणे सुरू केले. त्यातून त्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत अत्यवस्थ असलेल्या श्री सदस्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयासह खारघरमधील टाटा हॉस्पिटल व नवी मुंबईमधील वेगवगेळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी श्री भक्तांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती, त्याच ठिकाणी नंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. प्रशासनाने गतीने उपचार सुरू केल्यामुळे लोकांना लवकर औषध मिळणे सोपे झाले असेही अनेकांनी सांगितले.
दुपारी ४०-४२ डिग्री तापमान होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आपण एवढ्या कडक उन्हामध्ये कार्यक्रमाला उपस्थित आहात त्यामुळे मी आपल्याला मनापासून प्रणाम करतो असे सांगितले होते. कार्यक्रमाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात १२३ जणांना दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी दिली. खारघर येथील सोहळ्याची जय्यत तयारी महाराष्ट्र शासनाने केली होती. जवळपास ३५० एकर जागेवर काही लाख श्री सदस्य मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यातील विविध भागांतून दाखल झाले होते. या घटनेत जवळपास ३५० पेक्षा जास्त जणांना वेगवगेळ्या ठिकाणी उपचारार्थ दाखल
करण्यात आले आहे. यापैकी काहींना प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आले आहे. आठ जणांचा मृत्यू झाला असला तरी आणखी ५ लोक चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कार्यक्रम संपल्यानंतर जे भक्त आपापल्या गावी निघून गेले, त्यांना वाटेत त्रास झाला असेल तर त्याची माहिती गोळा करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. अद्याप त्याची आकडेवारी मिळालेली नाही.
मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रुग्णालयांना भेटी दिल्या. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. त्याशिवाय जे लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यावरचा सर्व खर्च सरकार करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल महानगरपालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.