Maharashtra Bhushan Award: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर, अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मात्र, यातच आता १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूबाबत शवविच्छेदन अहवाल समोर आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दुपारच्या सुमारास पार पडला होता. तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सियस असल्याने अनेकांना उष्माघाताची समस्या जाणवली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील १४ जणांचा मृत्यू झाला होता. आता १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.
शवविच्छेदन अहवालात नेमके काय म्हटलेय?
वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, १४ जणांचा मृत्यू उष्माघातामुळेच झाला आहे. या १४ पैकी १२ जणांचा शवविच्छेदन पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. तर, दोघांचे शवविच्छेदन अन्य रुग्णालयात करण्यात आले. यातील दोन मृतांना इतर व्याधींनी ग्रासलं होतं, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हटले आहे. १४ मृतांमध्ये १० महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. १६ एप्रिल रोजी रात्री उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर, सोमवारी १७ एप्रिल रोजी दोन जणांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी दिली आहे.
श्रीसदस्य ६ ते ७ तास होते उपाशी?
रिपोर्टनुसार मृत्यू झालेले श्री सदस्यांची पोटे रिकामी होती. मृत्यू होण्याआधी त्यांनी ६ ते ७ तासांपासून काही खाल्लेल नव्हते. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या जास्त वेळ संपर्कात राहिल्याने त्यांच्या शरीरात पाण्याची नसल्याचे दिसून आले. त्यापैकी काही श्री सदस्यांना सहव्याधी होत्या. त्यांनी अनेक तासांपासून काहीच अन्न खाल्लेल नव्हते. त्याचबरोबर त्यांनी पुरेसे पाणीही प्राशन केलेले नव्हते. अशात ते ४० अंश सेल्सिअस तापमान असताना उन्हात होते. हायपरटेन्शन किंवा ह्रदयाचा त्रास असलेल्या व्यक्तीला मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो, हे समजून सांगताना डॉक्टरांनी माहिती दिली की, मृतांपैकी एका व्यक्तीला ह्रदयविकाराचा त्रास होता. त्याबरोबर मधुमेह आणि हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींची प्रकृतीही अशा वातावरणात पटकन बिघडते. सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ उन्हाच्या संपर्कात राहायचं असल्यास थोड्या थोड्या अंतराने काहीतरी खाल्ले पाहिजे आणि पाणी प्यायला हवे. जे लोक चार ते पाच तास उन्हात बसलेले आहेत, केवळ पाणी पिल्याने त्यांना उष्माघाताचा त्रास टाळता येत नाही. शेडमुळे अशी घटना टाळता येऊ शकते, असेही डॉक्टरांनी सांगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दरम्यान, विरोधकांकडून टीका झाल्यानंतर सरकारने बॅकफूटवर जात एक मोठा निर्णय घेतला आहे. भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"