मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. आप्पासाहेब यांचा नातू श्रियान याचा बुधवारी व्रतबंध सोहळा रेवदंडा (जि. रायगड) येथे घरी झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. १४ मे १९४६ रोजी जन्म झालेले डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्षे निरुपण करत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठकी सुरू केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे कार्यही केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडे संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जाते. निर्माल्यातून खतनिर्मिती करून पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.
आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर फटाके वाजवून श्री सदस्यांनी आनंद व्यक्त केला. कुटुंबासाठी हा आनंददायी दिवस असल्याची प्रतिक्रिया सचिन धर्माधिकारी यांनी यावेळी दिली.
पुरस्कार वडिलांच्या चरणी अर्पण शासनाने माझ्या नातवाच्या व्रतबंध दिवशी मला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला, यासारखी भाग्यवान गोष्ट नाही. हे भाग्य माझे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे मिळाले आहे. मला मिळालेला पुरस्कार हा माझे वडील नानासाहेब यांच्या चरणी अर्पण करतो. - पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
ज्येष्ठ निरूपणकार आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेले समाजकार्य तितक्याच समर्थपणे त्यांनी वृद्धिंगत केले. कर्मकांडापेक्षा वृक्ष संवर्धन, जलस्रोत स्वच्छता, ग्राम आणि नगर स्वच्छता, रक्तदान अभियान, आदी समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी महाराष्ट्रभर एक विधायक चळवळ उभी केली. आध्यात्मिक अधिष्ठानातून उभारलेल्या रचनात्मक सत्कर्माचा हा सन्मान आहे असे मी समजतो. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना विशेष धन्यवाद! ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ जीवन गौरव पुरस्काराचे ते मानकरी आहेत याचा आनंद, समाधान आणि अभिमान आहे. लाखो अनुयायांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर धवलकार्य उभारणाऱ्या आप्पासाहेबांचे पुनश्च अभिनंदन !- राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत