मुंबई – राज्यातील आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने भाजपानेही पक्ष संघटनेत बदल केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपात अंतर्गत पदाधिकारी फेरबदल होतील असे बोलले जात होते. त्यात अखेर संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात अनेक प्रस्थापितांना धक्का दिल्याचे दिसून येते.
भाजप नागपूर शहराध्यक्षपदी बंटी कुकडे तर जिल्हाध्यक्षपदी सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभाजन करून एका जिल्ह्यात दोन-तीन अध्यक्ष भाजपाने दिले आहेत. त्यात पुणे शहर - धीरज घाटे, पुणे ग्रामीण(बारामती)- वासुदेव काळे, पुणे(मावळ) - शंकर बुट्टे पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.