मुंबई : आम्ही फोडाफोडी करत नाहीत. लोकच आमच्याकडे येतात. मोठा पक्ष आणि विश्वासामुळे लोक पक्षात येतात. पक्ष उभारण्यासाठी १८-१८ तास काम करावे लागते, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली होती.
राज ठाकरे यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्ष उभा करण्यासाठी १८-१८ तास मेहनत घ्यावी लागते. पंतप्रधान मोदी यांच्यावर असणाऱ्या विश्वासापोटी लोक भाजपमध्ये येत आहेत. भाजप आणि भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही फोडाफोडी करत नाहीत. लोकच आमच्याकडे येतात. पक्ष उभा करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. इतर कोणत्याही पक्षात जेवढे पक्षप्रवेश झाले नाही, तेवढे पक्षप्रवेश सुरू आहेत. लोकांना मोदींनी नऊ वर्षात केलेल्या कामाबाबत आनंद आहे. ते भाजपलाच मतदान करतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांना टोल नाक्यावर थांबविले आणि त्यांच्याशी हुज्जत घातली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर तोडफोड केली होती. या घटनेनंतर भाजपने रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली होती. या टीकेला बुधवारी राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली होती.