२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. अदानी-अंबानी यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणाऱ्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारला जाब विचारला आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप करत अदानी प्रकरणावरून प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी विरोधी आघाडीच्या 'इंडिया'च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आज गुरुवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली.
गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा महाराष्ट्राने सात प्रश्न विचारले असून याबाबत खुलासा करण्याचे आव्हान राहुल गांधींना दिले आहे. भाजपाने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "बालीश पुन्हा एकदा बरळला... राहुल गांधीनी खालील गोष्टींचा खुलासा करावा."
भाजपाचे राहुल गांधींना प्रश्न
- राहुल गांधी यांचे जिजाजी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रॉ आणि उद्योगपती अदानी यांचे संबंध काय? ते कोणत्या प्रकल्पावर काम करत आहेत?
- ममता बॅनर्जी आणि उद्योगपती अदानी एकमेकांना का भेटले?
- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गौतम अदानी सोबत काय करत आहेत?
- शरद पवारांचे आणि उद्योगपती अदानी यांचे काय संबंध आहेत? का वारंवार गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला जातात?
- हिडनबर्ग रिपोर्ट संदर्भात JPC शिफारस शरद पवारांनी का फेटाळून लावली? हे शरद पवारांना कधी विचारलं का?
- 2013 मध्ये महाराष्ट्रातील तिरोडा येथील 660 मेगावॅटचा थर्मल पावर प्लांट तत्कालीन काँग्रेस सरकारने अदानीला का दिला?
- बालबुद्धी राहुल गांधींनी सांगावे, याच मुंबईतील अदानी समुहाला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड काँग्रेसने का दिले?
तसेच अदानी समूहाला 2014 पूर्वी काँग्रेस सरकार कडून कोणकोणते पुरस्कार दिले आहेत हे जनतेला कळलं पाहिजे. काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने अदाणी समुहाला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. 2010-11 साठी मनमोहनसिंग सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्प - युनिट-1 त्वरित पूर्ण केल्याबद्दल गोल्ड शील्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2013, ऊर्जा मंत्रालय, मनमोहनसिंग सरकार कडून देण्यात आला. 2013 मध्ये याच काँग्रेसच्या कर्नाटकमधील सिद्धरमैय्या सरकारने सर्वश्रेष्ठ सुरक्षित पॉवर बॉयलर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार याच काँग्रेसने अदानी समूहाला दिलेले आहेत. ज्या व्यक्तीला NCC चा फुलफॉर्म माहिती नाही, तो व्यक्ती देशाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, बेरोजगारीबद्दल ज्ञान पाजळतो. ज्या व्यक्तीला देशाचं 52 सेकंदाचे राष्ट्रगीत समजून घ्यायला 28 सेकंद लागतात तो व्यक्ती आज वाट्टेल तसे आरोप करत आहे, अशा शब्दांत भाजपाने राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.