मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपला चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांच्या पोतडीतून शेतीसह नवीन रोजगार, विद्यार्थी आणि शिक्षण यासाठी अनेक तरतूद करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी उपाययोजना आणली असून त्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे.
महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचेही या अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजनेची मर्यादा 6 लाखावरुन वाढवून आठ लाखापर्यंत करण्यात आली आहे. स्कील इंडिया आणि कुशल महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यातील 15 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्रातील शैक्षणीक पातळी सुधारण्यासाठी आंतरराष्ट्री दर्जाच्या 100 शाळा उभारण्यात येणार असून त्यासाठी नवीन मंडळ स्थापन होणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे. शिक्षण आणि रोजगारासाठी याही तरतूदी करण्यात आल्या -
- मानव विकास मिशनसाठी 350 कोटी रुपयांची तरतूद.
- स्टार्टअप उदोयगांना प्रोत्साहन देण्यासाठी नविन कार्यक्रम
- जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - 50 कोटी
- मानव विकास मिशनसाठी 350 कोटी
- आकांक्षित जिल्ह्यांना 121 कोटी..
- विद्यार्थ्यांचं विद्यावेतन 4000 रुपयापर्यंत वाढवलं
- अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद
- महापुरुषांचे साहित्य सलग उपलब्ध व्हावे यासाठी वेबसाईटची निर्मिती - 4 कोटींची तरतूद
- महानुभाव पंथाचे आद्याप्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन केंद्र