मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी फडणवीस सरकारकडून सादर करण्यात येणाऱ्या शेवटच्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच राज्य सरकारच्या www. maharashtra.mygov.in या संकेतस्थळावरून सांकेतिक भाषेत अर्थसंकल्पाच्या कामकाजाचे प्रक्षेपण करण्यात येईल. जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना अर्थसंकल्पातील तरतूदी समजून घेण्यास मदत होईल. राज्य सरकार आणि हेलेन केलेर या दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, सरकारकडून गुरुवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात उद्योग, कृषी, स्थावर मालमत्ता, हॉटेल व्यवसाय आदी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत पीछेहाट झाल्याचे निराशाजनक चित्र दिसून आले होते. राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. मात्र उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात होणारी वाढ आणि कृषी उत्पादनातील घट ही राज्य सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब असून त्याबाबतच्या उपाययोजना शुक्रवारच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समोर येतील, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकार गंभीर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार केला जाईल. कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता अर्थसंकल्पात घेतली आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले होते.
Maharashtra budget 2018: राज्याचा अर्थसंकल्प दिव्यांगांसाठी प्रथमच सांकेतिक भाषेत होणार सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 11:36 AM