मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. याशिवाय, प्रस्तावित 42 माहिती तंत्रज्ञ उद्यानांतून 1 हजार 500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात 1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
याचबरोबर, इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत 18 प्रकल्प प्रगती पथावर आहेत. यासाठी 6 हजार 300 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यातून 12 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.