मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. सादर करण्यात आलेला 2020- 21चा आर्थिक अर्थसंकल्प हा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केला आहे, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत. सौर कृषिपंप योजनेद्वारे कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
याचबरोबर, गेल्या 2 वर्षांपासून उर्वरित महाराष्ट्रात शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देणे बंद आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपासाठी उर्वरित महाराष्ट्रात लघुदाब वीज वाहिन्यांवरून नवीन वीज जोडण्या देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे, असे डॉ. नितीन राऊत म्हणाले.
सौर कृषी पंप योजना पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली असून या योजनाद्वारे प्रतिवर्षं एक लाख 5 हजार सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 670 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषीपंपाना दिवसा कमीतकमी 4 तास वीज देण्याची घोषणा डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
सौर ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य आहे. तसेच उद्योगांवर असलेला क्रॉस सबसिडीचा बोजाही यामुळे कमी होण्यास मदत होईल. सध्या सरासरी वीज पुरवठा दर साडेसहा रुपये असून कृषिपंपाना 1 रुपया 88 पैसे या सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येते. मात्र यासाठी उद्योगांवर क्रॉस सबसिडी लावून तूट भरण्यात येते. दिवसा मुबलक प्रमाणात वर्षभर स्वच्छ सुर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे सौर वीजनिर्मिती करून कृषिपंपाची विजेची गरज भागविता येते, असेही डॉ. नितीन राऊत म्हटले आहे.
आणखी बातम्या...
महाराष्ट्र बजेट 2020: जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर
महाराष्ट्र बजेट 2020: विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प - अशोक चव्हाण
महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका
पूर्वीच्या कर्जमाफीची प्रक्रिया दीडवर्ष चालली; आम्ही दोनच महिन्यांत संपवणार : अजित पवार