मुंबई-राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. पण त्यासोबतच मराठी भाषा संवर्धनासाठीही ठाकरे सरकारनं काही महत्वाच्या घोषणा यावेळी केल्या आहेत.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मुंबईत १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन उभारलं जाणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून येत्या २ एप्रिल रोजी सरकारच्यावतीनं त्यासाठीचं भूमिपूजन देखील केलं जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. तसंच राज्यातील सर्व दुकानांवरील फलक देवनागरी लिपीतच असतील असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठीचे १ लाखाहून अधिक पोस्टकार्ड केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहेत. केंद्र सरकार याचा विचार करुन सकारात्मक प्रतिसाद देईल अशी आशा असल्याचं अजित पवार म्हणाले.
नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. तसंच प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभारून वाचन संस्कृती वाढावी आणि रुजावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
मराठी भाषेसाठी कोणत्या घोषणा?- मुंबईत मराठी भाषा भवन उभारणार, त्यासाठी १०० कोटींचा निधी- येत्या २ एप्रिलला मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम- प्रत्येक जिल्ह्या पुस्तकांचं गावं उभारणार - वाचन संस्कृती वाढावी आणि रुजावी यासाठी प्रयत्न केले जाणार- नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारणार- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, यासाठीची १ लाखाहून अधिक पोस्टकार्ड केंद्राला पाठविण्यात आलीत.