लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे असे स्मारक पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक (ता. शिरुर) व तुळापूर (ता. हवेली) येथे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय अन्य महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा शुक्रवारी स्मृतिदिन होता, त्याचा आवर्जून उल्लेख करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्मृतींना वंदन करून अर्थसंकल्प सादर करत असल्याचे सुरुवातीलाच सांगितले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारक दाम्पत्याचे निवासस्थान म्हणजे पुण्यातील फुलेवाडा. राज्य संरक्षित वारसास्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार यावर्षी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी शंभरावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करणार आहोत. त्यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाल खुर्द (ता. वेल्हे, जि. पुणे) येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या स्मृतिस्थान परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल.
सामाजिक प्रबोधनकार श्री संत जगनाडे महाराज यांचे समाधीस्थळ असलेले पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे (ता.मावळ) या क्षेत्राला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा आहे. श्री संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा विकास आणि परिसरातील सौंदर्यीकरणासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.