Maharashtra Budget 2022: मुंबईच्या जलवाहतुकीसाठी ३३० काेटी; नवी मुंबईत महाराष्ट्र भवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:17 AM2022-03-12T07:17:54+5:302022-03-12T08:15:19+5:30

मुंबईत लता मंगेशकरांच्या नावाने संगीत महाविद्यालय, राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याकरिता नवी मुंबई येथे १०० कोटी रुपये खर्च करुन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2022: 330 crore for Mumbai water boat transport; Maharashtra Bhavan in Navi Mumbai | Maharashtra Budget 2022: मुंबईच्या जलवाहतुकीसाठी ३३० काेटी; नवी मुंबईत महाराष्ट्र भवन

Maharashtra Budget 2022: मुंबईच्या जलवाहतुकीसाठी ३३० काेटी; नवी मुंबईत महाराष्ट्र भवन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, याकरिता राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याची मोहीम सुरु असतानाच २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत मराठी भाषेच्या विकास व संवर्धनाकरिता १०० कोटी रुपये खर्च करुन मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येत आहे. तसेच नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषा संशोधन उपकेंद्र उभारण्याकरिता २५ कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या २०२२-२३च्या अर्थसंकल्पात केली आहे. याखेरीज भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील संकुलात उभारण्याकरिता १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.

राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याकरिता नवी मुंबई येथे १०० कोटी रुपये खर्च करुन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे. याखेरीज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाकरिता नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे नवीन प्रशासकीय भवनाकरिता प्रशासकीय मान्यता दिल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक व समाजसुधारकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, याकरिता मुंबईत हेरिटेज वॉक आयोजित करण्यात येणार आहे.
शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतू २०२३ अखेर पूर्ण nमुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकांचे काम प्रगतीपथावर आहे. 

शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू 
प्रकल्पाचे ६४ टक्के काम पूर्ण झाले असून, हे काम २०२३च्या अखेरीस पूर्ण करण्याचा निर्धार अर्थसंकल्पीय भाषणात पवार यांनी व्यक्त केला. 
nकलानगर उड्डाणपूल आणि कल्याणजवळील उल्हास नदीवरील दुर्गाडी पूल वाहतुकीसाठी खुला केला असून, छेडानगर उड्डाणपूल, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचा विस्तार, वसई-विरारजवळील नायगाव पूल तसेच पनवेलजवळील नेवाळे फाटा या प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण होणार असल्याची ग्वाही अर्थसंकल्पात दिली आहे.

जलवाहतुकीकरिता ३३० कोटी खर्च अपेक्षित
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्याकरिता वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी, ऐरोली, मीठबंदर (ठाणे) व बेलापूर हा परिसर जलमार्गाने जोडण्याचा सरकारचा मानस असून, येथे जेट्टी व अन्य सुविधा निर्माण करण्याबरोबर खाडीच्या खोलीकरणाकरिता ३३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई-जालना-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेनचा पाठपुरावा
मुंबई-जालना-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

पारेषण प्रणालीत वाढ
मुंबई पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्याकरिता ११ हजार ५३० कोटी रुपये खर्चाची ४०० किलोवॅट क्षमतेची चार उपकेंद्र आणि एक हजार मेगावॅट क्षमतेचा अतिउच्चदाब वाहिन्यांचा पारेषण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

‘टाटा कॅन्सर रिसर्च’ला रायगडमध्ये जमीन
मुंबईतील टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर व हॉस्पिटलला आयुर्वेदिक रुग्णालय व औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे तांबाटी येथे १० हेक्टर जमीन दिली आहे.

जव्हारला पर्यटनस्थळाचा दर्जा
पालघर जिल्ह्यातील जव्हार या निसर्गरम्य ठिकाणाला पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. तेथे तसेच मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाकरिता २०२२-२३ या आर्थिक वर्षात सात कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

झोपडपट्टी सुधारण्यासाठी 
१०० कोटी

मुंबईमधील झोपडपट्टी सुधारण्यासाठी ज्याप्रमाणे स्वतंत्र निधी उपलब्ध होतो, त्याच धर्तीवर म्हाडाच्या मुंबईबाहेरील विभागीय मंडळाच्या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमधील मूलभूत कामे करण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात १०० कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे.

‘बैलघोडा’साठी 
१० कोटी

बैलघोडा हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना परळ येथे २ ऑगस्ट १८८६ रोजी झाली असून, या महाविद्यालयाच्या परिसरात ६० ते १२० वर्षे जुन्या १३ इमारती आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीकरिता १० कोटींचा निधी दिला आहे.

पदव्युत्तर शिक्षण क्षमतेत वाढ
देशातील होतकरु युवकांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी, याकरिता मुंबईतील सेंट जॉर्ज वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्थेतील शैक्षणिक क्षमतेत वाढ केली आहे. तसेच मुंबईतील सिडनहॅम, एल्फिन्स्टन आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाकरिता प्रत्येकी पाच कोटी रुपये नूतनीकरणासाठी दिले आहेत. जवाहर बालभवन या शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रांच्या इमारतीच्या नूतनीकरण व विस्तारीकरणासाठी १० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.

‘गेट वे ऑफ इंडिया’ला ध्वनिप्रकाश कार्यक्रम
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उपक्रम १२ मार्च २०२१पासून सुरु झाला असून, याकरिता ५०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. गेट वे ऑफ इंडिया वास्तूवर महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव दर्शविणारा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ध्वनीप्रकाश कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहे.
 

Web Title: Maharashtra Budget 2022: 330 crore for Mumbai water boat transport; Maharashtra Bhavan in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.