Maharashtra Budget 2022 : गडचिरोलीला नवीन विमानतळ; शिर्डी, रत्नागिरी, अमरावती व कोल्हापूर विमान वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 03:59 PM2022-03-11T15:59:26+5:302022-03-11T16:01:33+5:30
Maharashtra Budget 2022 : विमान वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, राज्यातील विमान वाहतुकीसाठीही (Transport budget 2022) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
विमान वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. यात शिर्डी विमानतळासाठी 150 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीसाठी तसेच रात्रीच्या वाहतुकीच्या कामासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर, कोल्हापूर विमानतळासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले असून गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे. तसेच, विमान वाहतुकीच्या जाळ्याने महाराष्ट्र देश-विदेशाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे. त्यामुळे राज्याल्या माल वाहतुक आणि इतर वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.
विमानतळासंदर्भात काय आहेत घोषणा?
- शिर्डी विमानतळावरून मालवाहतूक आणि रात्रीची वाहतूक सुरू होणार, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळाच्या विकास कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि भूसंपादनासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- अमरावती विमानतळावरून रात्रीची उड्डाणे, नवीन टर्मिनलची उभारणी आणि धावपट्टीचे रुंदीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- कोल्हापूर विमानतळासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
- गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन विमानतळे आणि विमानतळांचा विस्तार हा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
- नवीन विमानतळांमुळे वाहतुकीचे जाळे आणखी मजबूत होणार असून महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.
- विमान वाहतुकीच्या जाळ्याने महाराष्ट्र देश-विदेशाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे.