मुंबई - आज राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली आहे. कळसुत्री सरकारने विकासाच पंचसूत्र मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या सरकारने विकास पंचत्वात विलिन करण्याचे काम केले आहे अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच अर्थसंकल्पातून करण्यात आलेल्या बुलेट ट्रेनच्या घोषणेवरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
एकेकाळी समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सरकारकडून आता त्या प्रकल्पांचं श्रेय घेण्याचं काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मुंबईत आले होते. कदाचित मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनची घोषणा ही त्यांना भेटायला जाण्यासाठी करण्यात आली असावी. हेच लोक तेव्हा बुलेट ट्रेनला विरोध करत होते. आता ही दुटप्पी भूमिका कशासाठी, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
आज अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 16 हजार 39 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी 80 टक्के भार राज्य शासन उचलणार आहे. मुंबई-जालना-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.