मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडला आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. किल्ल्याचे जतन व संवर्धनासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. रायगड किल्ला व परिसर विकासाकरीता सन २०२२-२३ मध्ये १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी सन २०२२-२३ मध्ये 7 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, गनिमीकावा यांना जागतिक वारसा दर्जा देण्यात येणार आहे.
शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. महाराष्ट्राची अस्मिता, स्फुर्तीस्थान, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे त्यांचे स्मारक वढु बुद्रुक व तुळापूर, ता.हवेली जि.पुणे या परिसरात उभारण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून 250 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असामान्य शौर्य, धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी येत्या वर्षापासून महाराजांच्या नावाने “छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरू करण्यात येत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 125 वा स्मृतीदिन 10 मार्च 2022 रोजी झाला. फुले दांपत्याचे निवासस्थान “फुलेवाडा” पुणे शहरातील गंजपेठेत आहे. राज्य संरक्षित वारसास्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार यावर्षी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी 100 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष “कृतज्ञता पर्व”म्हणून साजरे करणार आहोत. त्यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाल खुर्द, ता. वेल्हे, जि. पुणे येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजेंच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या स्मृतीस्थान परिसराच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संत जगनाडे महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या सुदुंबरे ता.मावळ जि.पुणे या क्षेत्राला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा दिला गेला आहे. श्री संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा विकास आणि परिसरातील सौंदर्यीकरणासाठी 10 कोटी रूपये निधी उपलब्ध करुन देण्याचे ठरविण्यात आले आहे.